वाहतूक कोंडी आता नित्याचीच; बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिक हैराण!

रस्त्यांची खोदकामे, अतिक्रमणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे कोंडीत भर; वेळ, इंधन आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम
चौक | अर्जुन कदम 
शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाहनचालक आणि प्रवाशांच्या अंगवळणीच ही कोंडी पडल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक कोंडी ही आता नित्याची बाब बनली असताना, कायद्याचा धाक कमी झाला की वाहनचालकांचा बेशिस्तपणा वाढतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त खरेदी आणि प्रवासासाठी नागरिकांची मोठी वर्दळ वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र, या कोंडीसाठी केवळ वाहनांची वाढती संख्या नव्हे, तर वाहतूक नियमांचे उल्लंघनही तितकेच जबाबदार असल्याचे दिसून येते.
रस्त्यालगत सुरू असलेली बांधकामे, विविध कारणांसाठी वारंवार होणारी रस्त्यांची खोदकामे, तसेच पाणीपुरवठा, गॅस आणि फायबर केबल टाकण्यासाठी खोदले जाणारे रस्ते यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. रस्त्याच्या कडेला योग्य व्यवस्था नसणे आणि खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न करणे यामुळेही कोंडीत भर पडते. त्यातच प्रत्येकाला लवकर पोहोचण्याची घाई, अवजड वाहनांकडून वाहतूक नियमांचे पालन न होणे, तसेच तीनचाकी आणि दुचाकी वाहनचालकांकडून अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न यामुळे वाहतुकीचा खोळंबा अधिक वाढतो. परिणामी, काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ अडकून राहावे लागते.
वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ वेळेच्या अपव्ययापुरता मर्यादित राहत नाही. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने इंधनाचा अपव्यय होतो आणि नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार पडतो. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते, तर सततच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर बनते. हवामान बदल, वाढते तापमान आणि पाण्याची घटती उपलब्धता यांसारख्या व्यापक पर्यावरणीय प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याची गरज अधिक महत्त्वाची ठरते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे या समस्यांमध्ये आणखी भर पडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये चिडचिड, मानसिक ताण आणि आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असते. घाईघाईने वाहन चालवणे, वारंवार ब्रेक लावणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे यामुळे अपघातांचा धोकाही वाढतो. सर्वांत गंभीर बाब म्हणजे वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका किंवा पोलिसांची वाहने अडकल्यास आपत्कालीन मदत वेळेत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचू न शकल्याने औद्योगिक उत्पादन आणि आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी केवळ रस्त्यांची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करणे पुरेसे नसून, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करणेही आवश्यक आहे. अन्यथा, शहरांपुरती मर्यादित असलेली ही समस्या ग्रामीण भागातही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न बनत राहील.