शिळफाट्यावर खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने अनेक वाहनांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघे गंभीर, तर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली ट्रॅव्हल्सची बस सुरतहून प्रवाशांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात असताना शिळफाट्यावर बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बसने रिक्षा, कार, पिकअप आणि दुचाकींसह आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. यावेळी एका दुकानाचेही नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालय, डॉ. जाखोटिया हॉस्पिटल आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.