मंदिरातील मूर्ती चोरीचा २४ तासांत उलगडा; आरोपी जेरबंद, सहा गुन्हे उघड!

Theft of idol from temple solved within 24 hours

पनवेल | संजय कदम 

खारघर परिसरातील हनुमान मंदिर आणि गणपती मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनांचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी किशन राधेश्याम गंगावणे (वय ३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मूर्ती चोरीचे दोन आणि अन्य चार असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५०/२०२६ अंतर्गत हनुमान मंदिरातील मूर्ती चोरीची, तर गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५२/२०२६ अंतर्गत गणपती मंदिरातील मूर्ती चोरीची नोंद करण्यात आली होती. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संशयिताची ओळख पटवून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.
आरोपी किशन राधेश्याम गंगावणे (वय ३८) हा खारघर सेक्टर १० मधील कोपरा गावच्या स्मशानभूमीजवळ राहत असून, त्याचे मूळ गाव शिवनी शिवापूर, तालुका मंगरूळपीर, जिल्हा वाशिम असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून खारघर पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २४ तासांत मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनांचा छडा लावून अन्य चार गुन्ह्यांचीही उकल करण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.