भाऊबीजेला भावाच्या ताटात मटणाचा बेत; पहाटे दोनपासूनच दुकानांबाहेर रांगा!

रायगड | अमुलकुमार जैन 
भाऊबीजेच्या सणानिमित्त भावाच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याचे लाड करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू असतानाच, अलिबाग शहरासह रायगड जिल्ह्यात मटण खरेदीसाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवारी (ता. ११) भाऊबीजेच्या दिवशी पहाटे दोन वाजल्यापासूनच मटण दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याने बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते.
भाऊबीजेला भाऊ घरी येणार असल्याने त्याच्या ताटात आवडीचे मटण असावे, यासाठी बहिणींनी आधीपासूनच तयारी केली होती. काही बहिणींनी आपल्या पतीला, तर काहींनी मुलांना मटण आणण्यासाठी पहाटेच दुकानांवर पाठवले होते. त्यामुळे मध्यरात्रीनंतरच मटण खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू झाली. पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारासही दुकानांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
सण-उत्सवांमध्ये खाद्यसंस्कृतीला विशेष महत्त्व असते. भाऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाने जेवू घालण्याची परंपरा आजही उत्साहात जपली जाते. भावाच्या स्वागतासाठी बहिणींनी केलेली जय्यत तयारी आणि मटण खरेदीसाठी पहाटेपासून लागलेल्या रांगा यांतून भाऊबीजेचा उत्साह अलिबाग शहराह रायगड जिल्ह्यात पाहायला मिळाला.