उरण महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम! २५ वर्षांपासून आदिवासी बांधवांसोबत साजरी होतेय ‘दिवाळी पहाट’

उरण | विठ्ठल ममताबादे 
सणांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचित घटकांच्या जीवनातही आनंदाची दिवाळी फुलावी, या सामाजिक बांधिलकीतून कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने एक आदर्श उपक्रम जपला आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २५ वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदा पिरवाडी येथील आदिवासी कातकरी वाडीतील बांधवांसोबत दिवाळी साजरी करून महाविद्यालयाने सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव व्हावी आणि आदिवासी बांधवांचे जीवन जवळून समजावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के. ए. शामा यांनी या उपक्रमाचा इतिहास सांगत विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारावी, असे आवाहन केले. तसेच महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांनी ही सामाजिक परंपरा कायम जपावी, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत पिरवाडी आदिवासी कातकरी वाडीतील महिलांना ७० सहावारी साड्या व ७ बारा वारी साड्या, पुरुषांना ७५ टॉवेल, तर ६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय वाडीतील सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, माजी प्राचार्य के. ए. शामा, टी. एन. घ्यार, विशाल पाटेकर, रोहित पवार, तेजस आठवले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्थिक सहकार्य केले. जवळपास ७५ हजार रुपयांच्या मदतीतून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.