पनवेल बस स्थानक परिसरात आता चोरट्यांवर CC टीव्हीची करडी नजर! पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

Lack of drinking water at Panvel ST bus stand
पनवेल | संजय कदम 
 बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणे, बॅगा लंपास करणे आणि हातसफाईच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या चोरट्यांना आता आळा बसण्याची शक्यता आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने बस स्थानकाबाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पनवेल बस स्थानकाच्या अंतर्गत परिसरात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, बस स्थानकाबाहेरील परिसरात कॅमेरे नसल्याने चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. ही अडचण लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा केला. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अभिजीत पाटील यांनी या कामासाठी लेखी परवानगी दिल्यानंतर कॅमेरे बसविण्याचा मार्ग मोकळा झाला.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने या सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व वाढले आहे. कॅमेऱ्यांमुळे परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, चोरीच्या घटनांचा तपास करणे आणि संबंधित आरोपींची ओळख पटविणे अधिक सोपे होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला बळ मिळणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.