माणगांवात पिण्याच्या पाण्याची उघडपणे नासाडी; पाइपलाइन गळतीकडे नगरपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष

माणगांवात पिण्याच्या पाण्याची उघडपणे नासाडी
माणगांव | नरेश पाटील
माणगांव नगरपंचायतीकडून खांदाड परिसरात ठराविक कालावधीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यादरम्यान रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाहून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रेशन दुकानालगतच ही गळती होत असून, पाणीपुरवठा सुरू असेपर्यंत तब्बल दोन तास मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खांदाड परिसरातून जात असताना रस्त्यावरून एखाद्या लहान ओढ्याप्रमाणे जोरदार पाण्याचा प्रवाह वाहताना दिसल्याने प्रथमदर्शनी नेमके काय सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून पाऊसही नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत असल्याने पाहणी केली असता ही बाब पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधील गळतीची असल्याचे समोर आले.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून होणाऱ्या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे संबंधित पाइपलाइनचे नुकसान होऊन गळती निर्माण झाली आहे. ही पाइपलाइन एका घराच्या जोडणीशी संबंधित असून संबंधित घर सध्या बंद असल्याचेही समजते. त्यामुळे गळतीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गळतीतून बाहेर पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत जाऊन सुमारे ८० ते १०० मीटर अंतरावरील नदीपात्रात जाऊन मिळत आहे. गळतीच्या ठिकाणापासून नदीच्या दिशेने रस्त्याचा उतार असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने नदीकडे जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या मर्यादित कालावधीत मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी अक्षरशः वाया जात आहे.
पिण्याच्या पाण्याची अशी उघडपणे होणारी नासाडी टाळण्यासाठी माणगांव नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गळतीची तातडीने दखल घेऊन पाइपलाइनची आवश्यक दुरुस्ती करावी. संबंधित घर सध्या बंद असल्याने जोडणीची तपासणी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारे पिण्याचे पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.