प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असलेल्या एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा एक प्रकार अलिबाग बसस्थानकात समोर आला आहे. शिवशाही बसची काच फुटली, ती बदलण्याचे कामही झाले; मात्र काच काढल्यानंतर निर्माण झालेल्या धोक्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
अलिबाग आगारातील शिवशाही बसची फुटलेली काच काढल्यानंतर तिचे धारदार तुकडे आगारातील देखभालीसाठी असलेल्या जागेत न नेता थेट बसस्थानकातील पेपर स्टॉलसमोरील परिसरात टाकण्यात आले. प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी काचेचे तुकडे विखुरलेले असतानाही त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकाराचे छायाचित्र काढले जात असल्याचे एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून संबंधित जागा स्वच्छ करण्यास सांगण्यात आले. मात्र, काचेचे तुकडे गोळा केल्यानंतरही त्यांची स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट लावण्याऐवजी ते थेट बसस्थानकातील सर्वसाधारण कचरापेटीत टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
या घटनेतून एसटी प्रशासनाच्या कामकाजातील एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे. बसची देखभाल करताना केवळ वाहन दुरुस्त करणे पुरेसे आहे का? त्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या धोकादायक कचऱ्याची जबाबदारी कोणाची? प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होते का? बसस्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित ठिकाण असायला हवे. मात्र, देखभालीतून निघालेल्या काचेच्या तुकड्यांनाच प्रवाशांच्या मार्गावर जागा मिळत असेल, तर एसटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ बस चालविण्यापुरती मर्यादित नसून बसस्थानकातील प्रत्येक कोपरा सुरक्षित ठेवण्याचीही आहे. या प्रकाराची आगार व्यवस्थापकांनी चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.