हाळ खुर्द ग्रामपंचायतीने आगामी ग्रामसभेसाठी प्रसिद्ध केलेल्या विषयपत्रिकेत गावातील मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कब्रस्तानाच्या जागेच्या प्रश्नाचा उल्लेख नसल्याने ग्रामपंचायतीच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कर वसुली, घरपट्टी, पाणीपट्टी, वार्षिक अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आणि विविध प्रशासकीय विषयांना अजेंड्यात स्थान देण्यात आले असताना, नागरिकांच्या सन्मानपूर्वक दफनविधीसाठी आवश्यक असलेल्या कब्रस्तानाच्या जागेचा विषय का समाविष्ट करण्यात आला नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
ग्रामसभा ही गावातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून सामूहिक निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे कब्रस्तानाच्या जागेचा प्रश्न केवळ एका समाजापुरता मर्यादित न ठेवता मानवी प्रतिष्ठा, धार्मिक आस्था आणि नागरिकांची मूलभूत गरज म्हणून त्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गावातील उपलब्ध शासकीय जागांची माहिती घेणे, योग्य जागेची पाहणी करणे, आवश्यक प्रस्ताव तयार करून वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविणे आणि त्यासाठी कालबद्ध पाठपुरावा करणे, अशा मागण्या पुढे येत आहेत. आगामी ग्रामसभेत या विषयाचा स्वतंत्र समावेश करून अधिकृत ठराव मंजूर करावा, तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.