खोपोली नगर परिषदेत विजेची उधळपट्टी! अधिकारी दालनाबाहेर, तरीही AC-पंखे सुरूच; जनतेच्या पैशांची उधळण रोखणार कोण?

खोपोली | खलील सुर्वे
खोपोली नगर परिषदेत प्रशासकीय शिस्तीचा अभाव आणि विजेच्या अनाठायी वापराचा प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अधिकारी आपल्या दालनात उपस्थित नसतानाही एसी, पंखे आणि दिवे सुरू ठेवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शासनाकडून वीज बचतीचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे नगर परिषद कार्यालयातच विजेचा अपव्यय होत असेल, तर या कारभाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
नगर परिषद कार्यालयात दुपारी एक वाजता जेवणाची सुट्टी होते. काही अधिकारी-कर्मचारी कार्यालयातच जेवण करतात, तर काही अधिकारी जेवणासाठी थेट घरी जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच ते सात वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत असलेले काही अधिकारी घरी जेवायला गेल्यानंतर बराच वेळ उलटूनही कार्यालयात परतत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे.
जेवणाची सुट्टी अर्ध्या तासाची असताना ती तासनतास लांबत असेल, तर यावर नियंत्रण कोणाचे? घरी जेवायला जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी, पंखे आणि दिवे बंद करण्याची जबाबदारी कोणाची? नगर परिषदेचे वीजबिल नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून भरले जाते. मग जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी रोखणार कोण?
विशेष म्हणजे, नगर परिषद प्रशासनाने कार्यालयाच्या भिंतीवर दिवे, पंखे, संगणक व इतर विद्युत उपकरणे बंद केल्याची खात्री करण्याबाबत सूचना फलक लावले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या सूचनांचे पालन होते का? की हे फलक केवळ भिंतींची शोभा वाढवण्यासाठीच लावले आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्याऐवजी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयींनाच महत्त्व दिले जात असेल, तर सर्वसामान्यांनी दाद मागायची तरी कोणाकडे? मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि कार्यालयातील विद्युत उपकरणांच्या वापराची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
वीज बचतीचे फलक लावून उपयोग काय, जर त्याची अंमलबजावणी करणारेच नियम पाळत नसतील? जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि नागरिकांच्या कामांचा खोळंबा याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का? आता खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी या कथित मनमानी कारभाराला लगाम घालणार का, याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे.