पनवेलच्या पाणीटंचाईवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक; रखडलेली कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांना तंबी!

पनवेल | प्रतिनिधी 
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी रखडलेल्या जलपुरवठा योजनांवरून आक्रमक भूमिका घेतली. मोरबे धरणातून पनवेलसाठी १० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यासह एमआयडीसीकडून अतिरिक्त १० एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रलंबित कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली.
पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रभाग आणि सिडकोच्या वसाहतींमधील पाणीपुरवठा, प्रत्यक्ष उपलब्ध पाणी आणि वाढती मागणी यांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी न्हावाशेवा टप्पा क्रमांक तीनच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित करत, ही योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) आवश्यक आदेश देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. जीर्ण पाइपलाइन आणि प्रलंबित कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. पनवेलच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली.
मोरबे धरणातील खासगी विकासकासाठी राखीव ठेवलेले पाणी आरक्षण रद्द करून ते पनवेलसाठी उपलब्ध केल्यास शहराला सुमारे १० एमएलडी पाणी मिळू शकते, अशी सूचना आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली. याशिवाय एमआयडीसीकडून आणखी १० एमएलडी वाढीव पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. एमजेपीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत पाइपलाइनसंदर्भातील उर्वरित कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक रामदास शेवाळे, अरविंद म्हात्रे, ॲड. प्रथमेश सोमण, तुकाराम सरक यांच्यासह सिडको, एमजेपी, एमआयडीसी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता या उपाययोजनांमुळे पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर कितपत दिलासा मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.