माथेरान | तुषार जांभळे
माथेरान नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तब्बल तीन महिन्यांनंतर दि. २५ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेची विषयपत्रिका आणि विषयांवरील सविस्तर टिपण्णी नगरसेवकांना उपलब्ध करून न दिल्याने सभेत चांगलाच गदारोळ निर्माण झाला. प्रशासनाच्या या कारभारावर संताप व्यक्त करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना जाब विचारला. प्रशासनाकडून चूक झाल्याचे मान्य करण्यात आल्यानंतरही समाधान न झाल्याने विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, अनुसया ढेबे आणि अनिता रांजाणे यांच्यासह सभात्याग केला.
विरोधकांच्या मते, विषयपत्रिका आणि संबंधित विषयांवरील सविस्तर टिपण्णी उपलब्ध नसताना सर्वसाधारण सभा घेणे योग्य नव्हते. अशा परिस्थितीत सभा तहकूब करून काही दिवसांनी पुन्हा आयोजित करणे अपेक्षित होते. मात्र, विरोधी नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्यानंतरही सभा सुरू ठेवण्यात आल्याने नगरपरिषदेचा कारभार नेमका लोकप्रतिनिधी चालवतात की प्रशासकीय अधिकारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष परस्पर विषय निश्चित करून ते पुढे रेटत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी केला.
माथेरानच्या सत्ताधारी गटात अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवक असतानाही त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचा ठराव न करता अनेक कामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू असल्याचा दावा करत, ही परिस्थिती कायम राहिल्यास माथेरानच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता विरोधी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या कारभारात पारदर्शकता, नियमांचे पालन आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
——————————
