गणरायाच्या सुंदर आणि सुबक मूर्तींमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या पेण नगरीच्या सांस्कृतिक वैभवात अठराव्या पेण फेस्टिवलने आणखी एक मानाचा तुरा रोवला. स्वररंग पेण आयोजित ‘मिस रायगड २०२६’ ही प्रतिष्ठेची सौंदर्य स्पर्धा बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी पेण नगरपरिषदेच्या मैदानावर उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत बदलापूरच्या राणी रूपसिंग यादव हिने विजेतेपद पटकावत मानाचा मुकुट आपल्या नावे केला, तर खालापूरच्या आंचल पाटीलने प्रथम उपविजेतेपद आणि पनवेलच्या श्रीजा गुरांगने द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
या दिमाखदार सोहळ्याला भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषद सदस्या आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पेणच्या समृद्ध कलावैभवाचे कौतुक करत गणेशमूर्ती कलेमुळे पेणने जागतिक पटलावर स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले. स्वररंगचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी यांच्या अठरा वर्षांच्या सांस्कृतिक योगदानाचे तसेच नवनिर्वाचित कार्याध्यक्षा अक्षता अथर्व सावंत-साळवी यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. महाराष्ट्रातील विविध भागांतून सहभागी झालेल्या १७ स्पर्धकांनी पारंपरिक साडी, वेस्टर्न पोशाख आणि इव्हनिंग गाऊन अशा तीन फेऱ्यांमध्ये आपल्या सौंदर्याचे, आत्मविश्वासाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले.
स्पर्धेत विविध विशेष पारितोषिकांनीही स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पेण फेस्टिवलच्या अठरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, ‘सर्वांसाठी सर्वकाही’ या संकल्पनेतून हा महोत्सव रायगडच्या सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे.