1 लाख 4160 हेक्टर खासगी वनजमिनींचा प्रश्न मार्गी; कालवली-धारवली धरणाचा मोठा अडथळा दूर

पोलादपूर | शैलेश पालकर
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये कालवली धारवली धरणाचे काम कोणत्या विभागामार्फत सुरू झाले आणि कसे थांबले असा बारा वर्षांपूर्वी आमसभेमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर कोणासही अधिकृतपणे उत्तर न देता आल्याने आमसभाध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रश्नाला जय महाराष्ट्र करीत पुढील प्रश्नकर्त्यास संधी दिली होती. यानंतर सदरचे धरण हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करून या धरणाच्या कामाला पुन्हा चालना मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. वन आणि महसूल विभागाने दि.27 जुलै 2023 ला याबाबत पोलादपूर तालुक्यातील आंग्रेकोंड, धारवली-कालवली, हावरे आणि सवाद या गावांतील खासगी वनजमिनींच्या 35 च्या नोटीसा रद्द करण्याचा प्रस्ताव केल्यामुळे 1लाख 4160 हेक्टर खासगी वनजमिनींचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यातील धारवली कालवली लघुपाटबंधारे योजनेच्या धरणाचे काम पुर्णत्वाकडे जाईल की अन्य धरणांप्रमाणे याठिकाणचीही जंगलतोड वाढीस लागेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील धारवली कालवली धरणाच्या बंधाऱ्याचे काम तब्बल 26वर्षे रखडले असल्याने या धरणासाठी जमीन देणारे शेतकरी पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित रहावे लागत असल्याने आजतागायत हवालदिल झाले. पोलादपूर तालुक्यातील प्रस्तावित आणि निर्माणाधीन धरणप्रकल्पाच्या कार्यालयीन टिपणी अहवालामध्ये अधीक्षक अभियंता लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी पोलादपूर तालुक्यातील या धरणाचा उल्लेखही न केल्याने या धरणाचे काम कोणाकडून सुरू झाले, का थांबले, याबाबत याबाबत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी आमसभेमध्ये 12 वर्षांपूर्वी प्रश्न उपस्थित केला असता उपस्थित अधिकारी अभियंत्यांनी मौन धारण केल्याने आमसभाध्यक्ष आ.भरतशेठ गोगावले यांनी या प्रश्नालाच जय महाराष्ट्र करीत पुढील प्रश्नकर्त्यास त्याचा प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. मात्र, या धरणाविषयी पाठपुरावा करताना हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे या धरणाच्या कामाचा कार्यभार असल्याची माहिती प्राप्त झाली.
कालवली धरणाच्या कामाला 2000 साली सुरूवात झाली. तेव्हा स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आले नव्हते. याखेरिज, सरकारच्या अन्य खात्यांची परवानगी मिळविण्याचे सोपस्कारही याकामी पूर्ण करण्यात आले नव्हते. या धरणाच्या बॅकवॉटरच्या भागात मोठया प्रमाणात सेक्शन 35 ची वनजमीन असल्याने त्याबाबतची परवानगी संबंधित खात्याने घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भागातील बहुतांशी लोक नोकरी व्यवसायानिमित्त परदेशांमध्ये रहात असून त्यांच्या जमिनी या धरणप्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मायदेशी बोलावून घेतले. याकामात सहभाग म्हणून अनेकांनी आपली जमापूंजी खर्च करून डम्पर व ट्रक आदी वाहतूकीची साधने खरेदी केली. काही शेतकऱ्यांनी परिसराला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊन दुबार शेती होऊ शकेल, या वेडया आशेपोटी धरणासाठी अर्धीअधिक जमीन करण्याकामी सहकार्य केले. या धरणप्रकल्पामुळे आंग्रेकोंड व अन्य वाडयांचा दळणवळणाचा रस्ता बुडीतक्षेत्राखाली येणार असल्याने त्यांना पर्यायी रस्त्यासाठी 10 कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागणार होता. त्यामुळे त्या ग्रामस्थांची काहीशी नाराजी असूनही ते या धरणासाठी या गैरसोयीला कायमचे सामोरे जाण्यासाठी तयार झाले.
दरम्यान 2000 साली या धरणासाठी तत्कालीन काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये संघर्षाची भूमिकाही निर्माण झाली होती. शेतकरी कामगार पक्षातर्फे पंचतारांकित शेतकरी संघर्ष समिती तर काँग्रेसतर्फे सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समिती असे तारांकित युध्द सुरू होऊन अंतस्थ हेतू साध्य करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू झाला. धरणाच्या कामावर असलेल्या डम्परमागे ठराविक रक्कम संघर्ष समित्यांना देऊन त्यापैकी काही हिस्सा धरणग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचे ठरले तर संघर्ष समित्यांच्या बाजूने भाषणं ठोकणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी समित्यांच्या हिश्याच्या रकमेची लूट केली. मात्र, ग्रामस्थांनी या धरणास सहकार्याची भूमिका घेतल्याने कामास सुरूवात झाली. 2000 ते 2003 पर्यंत धारवली कालवली धरणातील मातीबंधारा, डबराचे पिचिंग, जॅकवेलची काँक्रीटमध्ये उभारलेली टाकी ही सर्व कामे अपूर्णावस्थेत ठेऊन या प्रकल्पाचे काम गुंडाळण्यात आले. मातीबंधाऱ्याच्या पुलाची रूंदी 50 मीटर्स अपेक्षित असताना सध्या ती तब्बल 5 मीटर्सपर्यंत आहे. एवढेच, बंधाऱ्याच्या भरावाचे काम करून हे धरण बारगळले. परिणामी,या धरणात कधीही पाणी साठले नाही आणि त्यामुळे दुबार पिकाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आजतागायत तीव्र असंतोष खदखदत आहे.
वनजमीनीवर अतिक्रमणाचे कारण देत बंद झालेल्या या धरणाचे काम सुरू होऊन यंदा तब्बल 26 वर्षे पूर्ण होत आहेत. पण कालवलीतील शेतकऱ्यांनी याकामी जमिनी देऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटूनही त्यांच्या त्यागाला फळ अथवा पाणीही मिळाले नाही. भोराव, कणगुले, कालवली, धारवली, वावे, माटवण, सवाद आदी गावांसह अन्य 12 वाडयांच्या ग्रामस्थांना दरवर्षी तीव्र उन्हाळयामुळे भूजल पातळी खाली गेल्यामुळे पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन कि.मी. अंतरावर जावे लागले आहे. परिसरातील पाणी योजना आणि बोअरवेल्स बहुतांशी अयशस्वी होत असल्याने या धरणाअभावी उद्भवलेल्या टंचाईच्या परिस्थिती स्पष्ट होऊन दरवर्षी पोलादपूर पंचायत समितीमार्फत कालवली ग्रामस्थांना टँकरसाठी संघर्ष करण्याची वेळ ओढवली. कालवलीचे माजी उपसरपंच सागर शेलार यांनी काही वर्षांपूर्वी धरणग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना संघटीत करण्यास सुरूवात केली त्यांच्या अनुत्सकतेमुळे पोलादपूर तालुक्यातील सर्वात पहिले शेतकरी आंदोलन यानिमित्ताने छेडले जाण्यापूर्वीच बारगळले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील 70 हजार एकर जमिनीवरील  वनजमिनी 35 च्या नोटीसा रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र, यापूर्वीच वन आणि महसूल विभागाने दि.27 जुलै 2023 ला याबाबत पोलादपूर तालुक्यातील आंग्रेकोंड, धारवली-कालवली, हावरे आणि सवाद या गावांतील खासगी वनजमिनींच्या 35 च्या नोटीसा रद्द करण्याचा प्रस्ताव केल्यामुळे 1  लाख 4160 हेक्टर खासगी वनजमिनींचा प्रश्न मार्गी लागला आहे. अलिकडेच महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी धारवली कालवली धरणाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक बोलावून पुन्हा वनजमिनींचे योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्यासंदर्भात सहकार्याचे आवाहन केले आहे. यामुळे 2000 सालापूर्वी संपादित जमिनींचा मोबदला आणि येत्याकाळात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचा मोबदला यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे. मात्र, माटवण, सवाद, कणगुले, वावे, धारवली, कालवली, हावरे या सातगावांतील शेतकऱ्यांना दुबार शेतीचे स्वप्न पुन्हा पडू लागले आहे.