वणवे–निंबोडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; आमरण उपोषणाचा इशारा!

चौक | अर्जुन कदम
खालापूर तालुक्यातील वणवे आणि निंबोडे गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने खालापूर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात निवेदन सादर केले.
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा येत्या २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा थेट ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून वणवे–निंबोडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खडी उखडली आहे. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, नोकरदार वर्ग आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले असून, एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्यायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागते.
यापूर्वी अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर २६ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर किंवा संबंधित ठिकाणी आमरण उपोषण केले जाईल आणि या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी वणवे व निंबोडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.