गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगला आळा बसावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी माणगाव पोलिसांनी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवर प्रभावी रूट मार्च काढला. पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती विठाबाई शंकर आंधळे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला.
माणगाव एसटी स्थानकाजवळील वाहतूक पोलीस चौकीपासून सुरू झालेला हा रूट मार्च मुख्य बाजारपेठेतून मोर्बा रोड कॉर्नर, शेलार नाका, कचेरी रोड मार्गे माणगाव पोलीस ठाण्यात येऊन समाप्त झाला. मात्र, हा रूट मार्च केवळ संचलनापुरता मर्यादित न राहता मार्गातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगची स्थिती आणि नागरिकांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयींची प्रत्यक्ष पाहणी करणारा ठरला.
दरम्यान, या प्रतिनिधीला रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त बाजारपेठेत असताना माणगाव पोलिसांचा हा रूट मार्च प्रत्यक्ष पाहता आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती बारकाईने पाहत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांबाबत पोलिसांनी तत्काळ भूमिका घेतल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
काही ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने उभ्या केलेल्या दुचाकी वाहनधारकांना पोलिसांनी वाहन हटविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रस्त्यावरील निश्चित मार्किंगकडेही वाहनधारकांचे लक्ष वेधण्यात आले. पोलिसांची सूचना मिळताच संबंधितांनी आपली वाहने तत्काळ हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनधारकांनाही वाहने बाजूला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कचेरी रोड परिसरातही बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकींवर पोलिसांनी कारवाई करत दंड आकारला. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांवर वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता, पार्किंगच्या छोट्या चुकीमुळेही वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे रूट मार्चदरम्यान पोलिसांनी अशा बाबींवर प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती यांनी संपूर्ण मार्गावर परिस्थितीची पाहणी करत पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांची उपस्थिती तर जाणवलीच; शिवाय नागरिकांना वाहतूक शिस्तीबाबत स्पष्ट संदेशही मिळाला.
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहरातील सुव्यवस्था यांना प्राधान्य देत माणगाव पोलीस यंत्रणा मैदानात उतरल्याचे या रूट मार्चमधून अधोरेखित झाले. ‘नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस रस्त्यावर आहेत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्तीवर आवश्यक ती कारवाई केली जाईल’, असा स्पष्ट संदेश या रूट मार्चमधून मिळाला.
या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. अखेर हा रूट मार्च माणगाव पोलीस ठाण्यात येऊन समाप्त झाला.