गणरायाच्या आगमनाच्या तोंडावर खांदाड अंधारात; पथदिव्यांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण?

माणगांव  | नरेश पाटील
गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील खांदाड गावातील महत्त्वाचे अंतर्गत रस्ते गेल्या दोन आठवड्यांपासून पथदिव्यांच्या अंधारात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सवापूर्वी पथदिव्यांची समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊनही आज रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने या समस्येला माणगाव नगरपंचायतीचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मोर्बा रोड ते माहेर मॅटर्निटी परिसरातील चारही पथदिवे बंद आहेत. अमरदीप हॉस्टेलच्या मागील बाजूस असलेल्या पाच पथदिव्यांपैकी केवळ दोनच सुरू आहेत. तर मराठी शाळेपासून मोर्बा रोडपर्यंतच्या मार्गावरील एकूण १४ पथदिव्यांच्या खांबांपैकी केवळ पाच दिवे सुरू असून तब्बल नऊ दिवे बंद आहेत. त्यामुळे खांदाडमधील अनेक महत्त्वाचे अंतर्गत रस्ते रात्रीच्या वेळी अक्षरशः अंधारात बुडाले आहेत.
याबाबत खांदाड येथील मंडळाचे युवक अध्यक्ष महेश पोवार उर्फ ‘बाला डीजे’ यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आपल्या घरासमोरील पथदिवाही बंद असल्याचे सांगितले. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या घरासमोर नवीन पथदिवा बसविण्यात आला होता; मात्र तिसऱ्याच दिवशी तो बंद पडला आणि अद्याप त्याची जागी नवीन दिवा बसविण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर त्याच्याजवळील आणखी एका खांबावरील बंद पडलेला पथदिवा खाली पडूनही तेथे अद्याप नवीन दिवा बसविण्यात आलेला नसल्याचे पोवार यांनी निदर्शनास आणून दिले.
विशेष म्हणजे, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३७ वाजता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माणगाव बायपासवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पाहणी दौऱ्यावेळी या प्रतिनिधीने माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना खांदाडमधील बंद पथदिव्यांची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी श्री. माळी यांनी सोबत उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना देण्याचे सांगितले होते. तसेच गणेशोत्सवापूर्वी पथदिव्यांची समस्या सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.
मात्र, आज रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजीही या समस्येवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. गेल्या सुमारे २० दिवसांत पाऊसही झालेला नव्हता; आजच काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पावसामुळे पथदिवे बंद असल्याचे कारणही या परिस्थितीला लागू होत नाही. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट समस्या निदर्शनास आणून देऊनही आणि गणेशोत्सवापूर्वी ती सोडविण्याचे आश्वासन मिळूनही पथदिवे बंदच राहणे, हा नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार ठरत आहे.
खांदाडमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण आठवडाभर रात्री विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रम होतात. भाविक घराघरांत आरतीसाठी मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा वेळी प्रमुख अंतर्गत रस्त्यांवरच अंधार असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वसामान्य भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अंधारामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता तरी माणगाव नगरपंचायतीने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी आणि खांदाडमधील सर्व बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीही जर नागरिकांना अंधारातूनच मार्गक्रमण करावे लागत असेल, तर पथदिव्यांच्या या दुरवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट सवाल आता खांदाडवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.