केएमजी विभागातील कुंभार आळीतील एम.बी. बी.एस. डॉ. केतन सुरेश नागोठणेकर यांचे वयाच्या 32 व्या वर्षी शनिवार 29 नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
येथील कुंभारआळी येथील रहिवासी असलेल्या केतन यांची घरची परिस्थितीत अत्यंत हलाखीची असूनही त्याची आई मनीषा नागोठणेकर यांनी छोटयाशा हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून काम करीत त्याचे 12 वी सायन्स पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या आईने जिथे काम करीत होती त्या डॉक्टरांची मदत घेऊन केतनला एम.बी. बी.एस. च्या डिग्री करिता ऍडमिशन घेतले.
एम.बी. बी.एस.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. केतन यांनी खाजगी हॉस्पिटल मधून काम करीत जिते गावामध्ये डॉ. केतन व त्याची पत्नी डॉ.मीनल यांनी प्रॅक्टिस चालू केली. अथांग मेहनतीनंतर त्यांनी तीन वर्षांनी याच जिते गावा मध्ये स्वतःचे नवीन हॉस्पिटल उभे केले. त्याचा फायदा मुंबई – गोवा महामार्गा लगत व जिते गावाच्या आसपासच्या सर्व गावांमधील नागरिकांना होत असून त्यांनाही चांगली आरोग्य सेवा मिळू लागली. व त्यांना अत्यंत माफक दरामध्ये सेवा मिळू लागल्याने त्यांनी अल्पावधीत गरिबांचे डॉक्टर म्हणून नाव लौकिक मिळवीला. अशा तरुण डॉक्टरांचे निधन झाल्याने नागोठणे व जिते गावाच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. केतन यांच्या पश्चात वडील सुरेश नागोठणेकर, पत्नी डॉ. मीनल व एक छोटी मुलगी असा परिवार आहे.त्यांचे उत्तर कार्य गुरुवार 11 डिसेंबर रोजी जिते येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती नागोठणेकर कुटुंबियांनी दिली.