आज दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान पेण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत पार पडल्याने पेणकरांनी लोकशाहीची कास धरल्याचे चित्र स्पष्ट दिसले. निवडणुकीपूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक, सौदेबाजी आणि पक्षांतर्गत खदखद यामुळे निर्माण झालेले तापमान लक्षात घेता मतदान दिवशी शांततेचे वातावरण ही पेणकरांसाठी जमेची बाजू ठरली. दरम्यान दिवसभरात एकूण 70.30% मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या निवडणुकीत १२ प्रभागांमधून २४ नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडून येणार आहेत. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरली. भाजप-राष्ट्रवादी महायुतीची युती (24+1), तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र लढत(05+00), तसेच शिशिर धारकर यांची “आम्ही पेणकर आघाडी”(05+01), संतोष श्रींगारपुरे यांची “नगरविकास आघाडी”(04+00), कॉंग्रेस आणि मित्र पक्ष(00+01) त्याचबरोबर मनसेचा स्वतंत्र लढा(01+00) यामुळे बहुकोनी संघर्ष निर्माण झाला.
याचदरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींनी राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ घडवून आणली. प्रभाग ९-अ मधील वसुधा तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड हा या निवडणुकीतील पहिला मोठा टप्पा ठरला. त्यानंतर झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचा एक व १७ नगरसेवकांचे अर्ज बाद झाल्यानंतर तर राजकीय वातावरणात आणखीच खळबळ उडाली. उमेदवारांचे तळ बदलणे, गटबाजी आणि चर्चा सतत वाढू लागल्या. अर्ज माघारीसाठी अंतिम तारीख 21 नोव्हेंबर असतानाही दोन दिवस आधी 5 उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी प्रभाग ५-ब मधून दीपक जयवंत गुरव आणि प्रभाग १२-ब मधून अभिराज कडू हे बिनविरोध निवडून आले.
निवडणूक प्रचाराच्या काळात बँकेचा मुद्दा, स्वच्छ पाणी, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्न सर्वाधिक गाजले. सर्वच पक्षांनी एकमेकांवर आरोपांची सरबत्ती करत असताना विरोधकांनीही विविध मुद्द्यांची पोलखोल करण्याची संधी साधली. शहरात मागील काही दिवसांत मोठ्या राजकीय चर्चांना आणि सौदेबाजीला उधाण आल्याचे दृश्य होते.
मतदानाचा आकडा
मतदार
संख्या
मतदान
महिला
17,271
12208
पुरुष
16,604
11606
एकूण
33,875
23814 (70.30%)
निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निकालप्रक्रिया स्थगित राहणार असल्याची स्पष्टता आली, आणि त्यामुळे मतदार, उमेदवार व सर्व राजकीय गटांचा हिरमोड झाला. आता 21 डिसेंबर रोजी येणाऱ्या न्यायालयीन निकालाकडे पेणकरांचे डोळे लागले असून तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.