‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’; दीड दिवसांच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप

माणगांव | नरेश पाटील
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात माणगाव शहरात दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी सायंकाळी भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. परंपरेनुसार दीड दिवसांनी गणरायाचे विसर्जन करणाऱ्या कुटुंबांनी विधिवत पूजा-अर्चा व आरती करून ढोल-ताशांच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि मांगल्याचा दाता असलेल्या गणरायाचे सोमवारी माणगांव शहरात घरोघरी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने आगमन झाले होते. विधिवत पूजा-अर्चा आणि आरतीनंतर गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली. मात्र, धार्मिक प्रथेनुसार अनेक घरांतील गणरायाचे दीड दिवसांनी विसर्जन केले जाते. त्यानुसार मंगळवारी दुपारपासूनच शहरातील विविध विसर्जनस्थळी गणेशमूर्तींच्या विसर्जनास सुरुवात झाली.
दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव नगरपंचायतीने नदीकाठ परिसरासह शहरातील सुमारे १४ विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व पूर्वतयारी व व्यवस्था केल्या होत्या. नगरपंचायतीच्या नियोजनबद्ध तयारीमुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
विसर्जन सोहळ्यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्तही पाहायला मिळाला. माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, पोलीस अधिकारी तसेच माणगाव नगरपंचायतीचे सिटी कोऑर्डिनेटर अतुल जाधव यांनी भाविकांमध्ये सहभागी होत विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत भाविकांनीही शांतता, शिस्त आणि भक्तिभाव राखत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गणरायाच्या आगमनावेळी जसा उत्साह आणि भक्तिभाव शहरात अनुभवायला मिळाला, त्याच उत्साहात अनेक कुटुंबांनी तसेच गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात मिरवणुका काढत बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने माणगांव शहरातील विसर्जनस्थळांचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.