रायगडच्या शाळांना मिळणार नवे ३५१ शिक्षक; ६१७ पदांची प्रतीक्षा कायम

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५१ उपशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे ३४०, तर उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक आहेत. कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन शाळांमध्ये रुजू करण्यात येणार आहे. मात्र, या नियुक्त्यांनंतरही जिल्ह्यातील ६१७ शिक्षकांची पदे रिक्त राहणार असल्याने शिक्षकांची तूट पूर्णपणे दूर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उपलब्ध शिक्षकांवर अध्यापनाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच प्रशासकीय आणि इतर शैक्षणिक कामांची अतिरिक्त जबाबदारी येत आहे. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण वाढत आहे. विशेषतः पोलादपूर, महाड, श्रीवर्धन यांसह दुर्गम भागातील शाळांना शिक्षकांची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मराठी माध्यमाची एकूण ६३८८ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ५२४९ पदे कार्यरत असून ११३९ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाची ३५५ मंजूर पदे असून २७७ पदे कार्यरत आहेत. त्यामुळे उर्दू माध्यमातील ७८ पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे दोन्ही माध्यमांतील शिक्षकांची एकूण १२१७ पदे रिक्त आहेत.
शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमाच्या ४८५ आणि उर्दू माध्यमाच्या ३५, अशा एकूण ५२० पदांची मागणी केली होती. त्यापैकी ३५१ पदांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ३५१ शिक्षक शाळांना उपलब्ध होणार आहेत.
६१७ पदे रिक्तच राहणार
३५१ शिक्षक रुजू झाल्यानंतर मराठी माध्यमातील सुमारे ५५० आणि उर्दू माध्यमातील ६७, अशी एकूण ६१७ पदे रिक्त राहतील. त्यामुळे नव्या नियुक्त्यांमुळे शिक्षकांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असला, तरी प्राथमिक शिक्षण विभागासमोरील मनुष्यबळाचे आव्हान कायम राहणार आहे.
दरम्यान, २ सप्टेंबरपासून पात्र उपशिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी होत आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
ऑक्टोबरमध्ये पुन्हा भरती
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरून या पदांसाठी अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यातील ३५१ नियुक्त्यांनंतरही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहणार असल्याने उर्वरित पदे भरण्याकडे लक्ष लागले आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने शिक्षकांची तूट आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होण्यासाठी पुढील भरती महत्त्वाची ठरणार आहे.