विधी शिक्षणातून न्यायव्यवस्थेला दिशा देणारे नेतृत्व घडवा : प्रा. मंजुनाथ आचार्य

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर
विधी शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचा प्रवास नाही तर न्यायव्यवस्थेला दिशा देणारे नेतृत्व घडविण्याची प्रक्रिया आहे. अभ्यासासोबत वक्तृत्व, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविल्याशिवाय उद्याचा सक्षम वकील घडू शकत नाही,असे प्रतिपादन लीला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. मंजुनाथ आचार्य यांनी केले.
प्रा. मंजुनाथ आचार्य विधी महाविद्यालय, शेलू येथे १३ सप्टेंबर रोजी विद्यार्थी विकास कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा व कायदेविषयक अभ्यासावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी विकास कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. मंजुनाथ आचार्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. ब्रम्हावले यांची मान्यवर म्हणून विशेष उपस्थिती लाभली. प्र. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या न्यायव्यवस्थेत डिजिटल कायदे संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, तार्किक विचार आणि न्यायालयीन मांडणीची क्षमता विकसित होत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत पाच वर्षे एलएलबी व तीन वर्षे एलएलबी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रचलित कायदेविषयक विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. संविधान, महिला हक्क, सायबर गुन्हे, पर्यावरणीय कायदे आणि न्यायव्यवस्थेतील आधुनिक आव्हाने या विषयांवरील विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. किर्ती वाडेकर व प्रा. निता गमरे यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रा. सुखदा शेट्ये, प्रा. सुजाता पाडवी आणि ग्रंथपाल अंकुश गवई यांनी तज्ज्ञ परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन प्रा. निता गमरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विधी विद्यार्थी उल्हास चंदने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.