गणेशोत्सवासाठी माणगांव सज्ज; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन

माणगांव | नरेश पाटील
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती गर्दी आणि माणगाव शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी गणेशोत्सवासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. पोलिस, प्रशासन आणि नगरपंचायतीच्या समन्वयातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव काळात कोकणात ये-जा करणाऱ्या लाखो भाविकांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. पेण, वडखळ, नागोठणे, वाकण, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड आणि पोलादपूर येथे कोंडी झाल्यास वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माणगावचे नवीन पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या पुढाकाराने झालेल्या पत्रकार परिषदेत DYSP शशिकांत पवार यांनी ही माहिती दिली.
माणगाव शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटी बसस्थानक तात्पुरते रेल्वे स्थानक परिसरात हलविण्यात येणार असून, शहरात दिवस-रात्र पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तयार झालेल्या माणगाव बायपासचा वापर करून पुणे व पालीकडून गोवा, महाड आणि श्रीवर्धनकडे जाणारी वाहने वळविण्यात येतील. तसेच जुने पंचायत समिती आवार, एसटी आगार, महाड को-ऑपरेटिव्ह बँकेमागील परिसर आणि जुन्या नगरपंचायत कार्यालयामागील रायगड जिल्हा परिषद शाळेजवळ तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.