कोकणच्या विकासाचे चित्र पाहिले तर एकीकडे अवघड डोंगर-दऱ्या, नद्या आणि खडकाळ भागातून मार्ग काढत कोकण रेल्वे अवघ्या आठ वर्षांत साकारली गेली; तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला तब्बल १८ वर्षांहून अधिक काळ लोटूनही काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये ‘प्रकल्पाची अडचण मोठी की नियोजनाचा अभाव?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
कोकण रेल्वे उभारताना तब्बल ७५० किलोमीटरचा नवीन मार्ग, ९१ बोगदे, २,२८६ पूल आणि सुमारे ८५ किलोमीटरचा बोगदा मार्ग उभारण्यात आला. अवघ्या आठ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करून कोकणाला देशाच्या रेल्वे नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यात आले. त्यामुळे कोकण रेल्वे आजही अभियांत्रिकी आणि नियोजनाचा आदर्श मानली जाते.
याच्या अगदी उलट चित्र मुंबई-गोवा महामार्गाचे आहे. मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या सुमारे ४५० किलोमीटरच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक टप्प्यांत सुरू आहे. या मार्गावर सुमारे १२० पूल आणि दोन बोगद्यांची कामे प्रस्तावित असतानाही प्रकल्पाला अपेक्षित गती मिळालेली नाही. वाढता खर्च, वारंवार बदलणारे आराखडे, भूसंपादन आणि विविध अडथळ्यांमुळे महामार्गाचा प्रवास लांबतच गेला.
प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, विकासाच्या वेगाचा!
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या पर्यटन, उद्योग आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी, धुळीचे लोट, खड्डे आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. ‘कोकण रेल्वेने आठ वर्षांत अशक्य वाटणारे शक्य केले, मग महामार्गासाठी एवढी वर्षे का?’ हा प्रश्न आता केवळ प्रवाशांचा राहिलेला नसून, संपूर्ण कोकणच्या विकासाचा प्रश्न बनला आहे. महामार्गाचे काम केवळ पूर्ण करण्यापेक्षा ते वेळेत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.