कर्जतच्या निसर्गा गवळीची आंतरराष्ट्रीय भरारी! कांस्यपदक जिंकत भारताचा तिरंगा फडकावला   

कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यातील मानिवली गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावातील कन्या निसर्गा दिलीप गवळी हिने ऑस्ट्रिया–जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आइस स्टॉक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकत भारताचा तिरंगा सातासमुद्रापार अभिमानाने फडकावला.
यादवराव तासगावकर पॉलिटेक्निकच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या निसर्गाने इंडिव्हिज्युअल टार्गेट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत जगात सातवा क्रमांक पटकावला. अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांसह १५ देशांतील सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
आइस स्टॉक हा जगातील सर्वात आव्हानात्मक क्रीडाप्रकारांपैकी एक मानला जातो. उणे तापमानात गोठलेल्या बर्फावर उभे राहून प्रत्येक फेक अचूक लक्ष्यावर पोहोचवावी लागते. घसरडा पृष्ठभाग, कडाक्याची थंडी आणि मानसिक स्थैर्य या तिहेरी कसोटीवर निसर्गाने मात करत भारतासाठी कांस्यपदक मिळवले.
निसर्गाला सुरुवातीला बॉक्सिंगची आवड होती. सातवीत असतानाच तिने क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधून पुढे जात तिने राष्ट्रीय स्तरावर रायगडचे प्रतिनिधित्व केले. रशिया आणि गोवा येथे सुवर्णपदके जिंकत तिने आपली क्षमता सिद्ध केली. जम्मू-काश्मीर (२०२३), कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली.
निसर्गाच्या यशामागे अनेक प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. सुरुवातीला कोच स्वप्नील अडुळकर यांनी तिची पायाभरणी केली. त्यानंतर संस्कृती घरत (नवी मुंबई), महेश राठोड आणि इरफान सर यांनी प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक मार्गदर्शन करून तिचा आत्मविश्वास वाढवला. “आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यामागे माझ्या प्रशिक्षकांचे मोठे योगदान आहे,” असे निसर्गा सांगते.
निसर्गाचे वडील दिलीप गवळी हे उत्कृष्ट कबड्डीपटू असून आई रुपाली गवळी यांनी खो-खोमध्ये प्राविण्य मिळवले आहे. सध्या त्या गृहिणी असल्या तरी मुलीच्या स्वप्नासाठी दोघांनीही आर्थिक, मानसिक आणि नैतिक पाठबळ दिले. “आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला; मेहनत मात्र निसर्गानेच केली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक यशाबद्दल तासगावकर समूहाचे चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी निसर्गाचा विशेष सत्कार केला. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मानिवली ग्रामस्थांनी तिच्या जागतिक यशाचे स्वागत करत ही संपूर्ण रायगडसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.