भिवपुरी कॅम्पमध्ये ब्लास्टिंगचा धसका; ग्रामस्थांची पोलिसांत सामूहिक तक्रार

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर 
 कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडी व तापकीरवाडी येथे टाटा पॉवर कंपनीचे 65 एकरमध्ये धरणाच्या बांधकाम प्रकल्पाकडून खोदकाम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून, वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे जीवन असुरक्षित झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कर्जत पोलीस ठाण्यात सामूहिक लेखी तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ब्लास्टिंग वेळी वापरण्यात येणारे रबर मॅट वापरले जात असून्य रबर मॅटचा मोठा तुकडा उडाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक घरांमध्ये प्रचंड हादरे बसले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत वारंवार प्रशासनाला सांगून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रकल्प परिसरात रात्री-बेरात्री कोणत्याही वेळी ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे झोपेत असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि लहान मुले दचकून जागी होतात, तर महिलांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
तक्रारीत तातडीने ब्लास्टिंग थांबवून संपूर्ण चौकशी करावी, नाहीतर आमचे पुनर्वसन करण्यात यावे,सुरक्षेचे कडक नियम लागू करावेत आणि ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी,अन्यथा आम्ही सह कुटुंब कंपनीच्या बांधकाम ठिकाणी जाऊन बसू अशी आणि काम बंद पाडू म्हणून इशारा देखील देण्यात आला.