रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरटीओ एजंट विलास गणपती सनगर (वय ६२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने मंगळवारी रंगेहात ताब्यात घेतले.
खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर भर दुपारी १.५६ वाजता ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारे विद्यालय चालवतात. रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी त्यांनी सनगर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित प्रक्रियेसाठी २५ हजार ७०० रुपये शासकीय शुल्क असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याव्यतिरिक्त ४ हजार ५०० रुपयांची लाच मागण्यात आली.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता सनगर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. सनगर हे ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालय परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निता भासेले यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पर्यवेक्षणाखाली पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.