पालकमंत्री भरत गोगावले यांचा कर्जतमध्ये दिमाखदार सत्कार सोहळा

कर्जत | गणेश पवार
कर्जत येथे रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला .
यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. राजकीय दबावतंत्राचा वापर करून संघर्षशील नेतृत्वाला रोखण्याचे प्रयत्न झाले, मात्र ज्यांच्या पाठीशी संघर्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास आहे, अशा नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडावर स्वराज्याची राजधानी उभारली, त्या ऐतिहासिक आणि स्वाभिमानी रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळणे ही अभिमानाची बाब आहे. हा विजय केवळ भरत गोगावले यांचा नसून शिवसेनेचा, भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार महेंद्र दळवी आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील भरत गावले यांचे अभिनंदन करत मनोगत व्यक्त केले.
आमदार तथा शिवसेना उपनेते शहाजीबापू पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या लढाईचा उल्लेख करत, गेल्या महिन्याभरात या संघर्षाचा शेवट झाला आणि अखेर भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले, असे सांगितले.
या नागरी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या पालकमंत्रीपदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते, त्या सर्वांचा सत्कार सोहळा असल्याचे मिश्कीलपणे सांगितले. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त करत, “टीका करणाऱ्यांना कामाने उत्तर देऊ, विकासाने उत्तर देऊ,” हा एकनाथ शिंदे साहेबांचा विचार असून त्याच पद्धतीने आपण काम करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्र दळवी, शिवसेना उपनेते माजी आमदार शहाजी बापू पाटील, भाजपाचे शरद लाड, दीपक बेहेरे,राजेश भगत, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.