शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत बारावीनंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करण्यासाठी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर वसतिगृह प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येत असल्यास त्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.