गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि कोंडीमुक्त राहावी, तसेच गणेशभक्त व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागोठणे उड्डाणपुलावर विशेष लक्ष
गणेशोत्सव काळात नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करून परिस्थितीनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतील वाहतूक व्यवस्थापनाचा दैनंदिन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माणगांव, इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश
पनवेल ते इंदापूर तसेच इंदापूर ते झाराप या मार्गावरील कामांचा आढावा घेताना माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखताना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक देखरेख ठेवावी, तसेच कामांमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे, असे भोसले यांनी सांगितले.
महामार्गावर सुविधा केंद्रे उभारणार
गणेशोत्सव काळात महामार्गावर प्रवासी आणि वाहनांची मोठी वर्दळ राहणार असल्याने आवश्यक ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या केंद्रांवर स्वच्छता, पाणी, वीज आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रवाशांसाठी पुरेशा प्रमाणात चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले.
पर्यायी मार्गांची चाचपणी
महामार्गावरील वाहतुकीचा भार वाढल्यास कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करावी. आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्त्यांचा वापर करता यावा, यासाठी त्यांची दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांमुळे कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना आधीच पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही गणेशोत्सव काळात वाहतूक, रस्ते, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या.