भारताच्या विकसित राष्ट्राच्या प्रवासात महानगरांसोबतच गाव, लहान शहरे आणि विद्यापीठांचीही महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समाजाच्या समस्या सोडविणारे अभियंते व्हावे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण उपजीविकेतील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या 28 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांनी विद्यार्थ्यांना नव्या कल्पनांचे कृतीत रूपांतर करण्याचे आवाहन केले. डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांचा उपयोग करून आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील प्रत्यक्ष समस्या ओळखून तंत्रज्ञानाधारित उपाय शोधावेत. विकसित भारत 2047 साकारण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाशी नाते कायम ठेवावे. तसेच नशामुक्त भारतासाठीही युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठातील परीक्षांच्या निकालांचा प्रलंबित बॅकलॉग मोठ्या प्रमाणात दूर केल्याची माहिती दिली. यापुढे निकालानंतर पदवी प्रमाणपत्र तात्काळ तयार करून ‘डिजी लॉकर’मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठातील रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सीड कॅपिटल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विद्यापीठाची निवड झाली असून 35 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी विद्यापीठासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. आदिती तटकरे यांनी विद्यापीठातील उपलब्ध जागा व सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उपयोग करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.