मुरूड-डोंगरी–मुंबई एसटी सेवा २० दिवसांपासून बंद; प्रवाशांचा संताप!

रायगड | अमुलकुमार जैन
मुरूड-डोंगरी ते मुंबई सेंट्रल ही एसटी बससेवा गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बससेवा बंद करण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाहक आर. बी. मुंडे यांनीही ही बससेवा बंद असल्याची माहिती दिली आहे.
मुरूड आगारप्रमुख चिन्मय यांच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांपूर्वी मुरूड येथे काही प्रवाशांनी आंदोलन केले होते. यावेळी सकाळची मुरूड-मुंबई बस डोंगरीमार्गे न पाठवता दादरमार्गे मुंबईला सोडावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर डोंगरी मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या निर्णयामुळे डोंगरी तसेच मार्गावरील गावांमधील सर्वसामान्य एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी दादरमार्गे बस सोडण्याची मागणी केली, त्यापैकी प्रत्यक्षात कितीजण नियमित एसटीने प्रवास करतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सर्वसामान्य एसटी प्रवाशांचे हाल झाले तरी चालतील; मात्र मुरूडहून धावणाऱ्या खासगी बससेवेचे उत्पन्न वाढले पाहिजे, असा या निर्णयामागे काही हेतू आहे का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे काही मोजक्या प्रवाशांच्या मागणीवरून मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणे योग्य आहे का, याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
मुरूडमधून मुंबई-डोंगरी मार्गावर एसटी बससेवा सुरू असताना तिचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न केले जात आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांची संख्या वाढविणे, वेळापत्रकात आवश्यक बदल करणे आणि सेवा अधिक सोयीची करणे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बससेवा बंद करण्याचा मार्ग का स्वीकारला जात आहे, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.
बससेवा तातडीने सुरू करून डोंगरी परिसरातील प्रवाशांना दिलासा द्यावा आणि बस बंद करण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.