बेने इस्रायली ज्यू समाजाच्या नव्या पिढीतील बेन, खनोक आणि नॅन्सी सातमकर यांनी आपल्या पूर्वजांच्या भूमीशी असलेले ऐतिहासिक व भावनिक नाते पुन्हा अनुभवण्यासाठी बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील विघवली गावाला भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे कोकणातून इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने इस्रायली समाजाच्या ऐतिहासिक मुळांना पुन्हा उजाळा मिळाला.
बेने इस्रायली समाजाचा संबंध रायगड जिल्ह्यातील रोहा परिसरातील विरजोळी (सातंबा) गावाशी असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांपूर्वी या समाजातील कुटुंबांनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले. पुढील पिढ्या इस्रायलमध्ये स्थायिक झाल्या असल्या तरी आपल्या पूर्वजांची भूमी, संस्कृती आणि कोकणच्या मातीशी असलेली नाळ आजही कायम असल्याचे या भेटीतून जाणवले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच ग्राम विकास समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित झाले.
यावेळी सचिन उभारे, विठोबा दळवी, बेंडखळे गुरुजी, ह.भ.प. अनंत विचारे, अजित जंगम, विनायक सापळे, विश्वास सापळे, वसंत साठे, किशोर बेंडखळे, नथुराम विचारे, अरविंद सालदूर, विकेश सापळे, अनिल मानकर, नागेश शेपुंडे, विजय सापळे, वंदन सापळे, बाळाराम शेपुंडे, दत्ता उभारे, भागोजी सापळे, शरद सापळे आदींसह ग्रामस्थांनी सातमकर कुटुंबीयांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले.
इस्रायलच्या प्रगतीची माहिती ऐकून ग्रामस्थ भारावले
ग्रामस्थांशी झालेल्या संवादात बेन, खनोक आणि नॅन्सी सातमकर यांनी इस्रायलने विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची माहिती दिली. संरक्षण, जलव्यवस्थापन, आधुनिक शेती, शिक्षण, बँकिंग, महिला सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत इस्रायलने केलेल्या विकासाचा त्यांनी संक्षिप्त आढावा मांडला. ,विशेषतः पाण्याचा कार्यक्षम वापर, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगती याबाबतची माहिती ग्रामस्थांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही इस्रायलने विविध क्षेत्रांत केलेली झपाट्याने प्रगती ऐकून ग्रामस्थ भारावून गेले.
या संवादादरम्यान भाषेची अडचणही फारशी जाणवली नाही. हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषांचा सोयीस्कर वापर करण्यात आल्याने सातमकर कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांच्यात मनमोकळा संवाद झाला. संवादाच्या पुढील टप्प्यात एका ग्रामस्थाने सातमकर कुटुंबीय आणि सुधीर सापळे यांचा परिचय कसा झाला आणि त्यांच्या माध्यमातून विघवली भेट कशी घडली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे या ऐतिहासिक भेटीमागील परिचयाचा धागा ग्रामस्थांच्या चर्चेत आला. कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा यासाठी मंदिराचे पुजारी सचिन बेंडखळे यांनी उत्कृष्ट ध्वनीव्यवस्थेची व्यवस्था केली होती. त्यामुळे संवाद आणि स्वागत सोहळा अधिक प्रभावीपणे पार पडला.
विघवलीतील झालेली ही भेट केवळ औपचारिक भेट न राहता इतिहास, संस्कृती, विकास, श्रद्धा आणि माणुसकीच्या नात्याचा भावनिक संगम ठरली. इस्रायलमध्ये स्थायिक झाल्यानंतरही आपल्या पूर्वजांच्या मातीची ओढ नव्या पिढीत कायम असल्याचे या भेटीतून प्रकर्षाने अधोरेखित झाले.