जेष्ठ पत्रकार उदय भिसे यांचं हृदयविकारानं निधन

नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष,चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे जुने रामेश्वर मंदिर ट्रस्टी,सन्मित्र गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार उदय रघुनाथ भिसे यांचे बुधवार 02 सप्टेंबर रोजी वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
उदय भिसे यांनी सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, कुणावर झालेला अन्याय असेल किंवा कोणत्याही सामाजिक जनहिताच्या प्रश्नांवर अनेक वेळा पत्रकारतेच्या माध्यमातून आवाज उठवून प्रत्येकाला न्याय देण्याचे कार्य सातत्याने करीत असल्याने ते संपूर्ण रायगड जिल्हयात परिचित होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चांगले पत्रकार घडविले. विभागातील नागरिकांसह सर्व पत्रकारांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमी होत असे. त्यांच्या आकस्मित जाण्याने नागोठणे पत्रकार संघासह सर्वच पत्रकाराची मोठी हानी झाली आहे.
अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत राहून मोलाचे कार्य करणारे भिसे यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशान भूमीत बुधवार 02 सप्टेंबर रोजी रात्री 9.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अक्षय भिसे वआर्चीत भिसे हे पूतणे तसेच अनुपा देशपांडे ही विवाहित बहीण असा परिवार आहे. उदय भिसे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी तर उत्तर कार्य रविवार 13 सप्टेंबर रोजी प्रभू आळीतील राहत्या घरी होणार असल्याची माहिती भिसे कुटुंबियांनी दिली.