रुग्णालयात एक्सपायर्ड सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार

रायगड | अमुलकुमार जैन 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ५० वर्षीय रुग्णाला मुदत संपलेले अर्थात ‘एक्सपायर्ड’ सलाईन लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले असून, तो सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडसे हे तीन दिवसांपूर्वी थंडी-तापाच्या त्रासामुळे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. तपासणीनंतर त्यांना फाल्सीपॅरम मलेरिया आणि डेंग्यूचे निदान झाले. त्यांची प्लेटलेट्सची संख्या ४० हजारांपर्यंत घसरल्याने प्रकृती गंभीर बनली. दरम्यान, त्यांना लावण्यात आलेले सलाईन तब्बल महिनाभरापूर्वीच एक्सपायर झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे रुग्णालयातील औषधे व वैद्यकीय साहित्याच्या तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सलाईनच्या साठवणुकीपासून ते रुग्णाला लावण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यात येणार आहे. स्टोअरकीपरपासून उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.