आजाद समाज पार्टी (कांशीराम) आणि दलित पँथर यांच्या माध्यमातून जय जगदंबा माध्यमिक विद्यालय, खांडस येथे पाहणी करण्यात आली. यावेळी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आणि शैक्षणिक व्यवस्थेशी संबंधित अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मुलींसाठी असलेल्या शौचालयाची अवस्था अत्यंत खराब असून, त्याची दुरवस्था पाहता भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याची चिंता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर रोडगे हे शाळेत उपस्थित नसल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्याध्यापकांच्या हालचाल वहीची पाहणी केली असता त्यांच्या गैरहजेरीबाबत स्पष्ट नोंद आढळली नसल्याचा दावा करण्यात आला.
तसेच शाळेतील सफाई कर्मचारी शंकर भोईर हे ऑन ड्युटी असतानाही पाहणीच्या वेळी शाळेत उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. संघटनांचे पदाधिकारी शाळेत पाहणीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर ते शाळेत आले, असा आरोपही करण्यात आला. शाळेच्या परिसरात आवश्यक त्या प्रमाणात स्वच्छता नसल्याचेही पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षण याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका आजाद समाज पार्टी आणि दलित पँथर यांनी घेतली आहे.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत आजाद समाज पार्टी (कांशीराम) आणि दलित पँथर यांच्या माध्यमातून जय जगदंबा माध्यमिक विद्यालय, खांडस प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची दुरुस्ती, शाळेतील स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दहा दिवसांच्या कालावधीत संबंधित प्रश्नांचे समाधानकारक निराकरण झाले नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्ती व यंत्रणेविरुद्ध कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या पाहणीवेळी प्रशांत भाई जाधव – आजाद समाज पार्टी (कांशीराम), कर्जत तालुका अध्यक्ष; आशिष भाई खंडागळे – दलित पँथर, कोकण प्रदेशाध्यक्ष; रोहित भाई जाधव – आजाद समाज पार्टी (कांशीराम), रायगड जिल्हा महासचिव; तसेच Adv. सिद्धार्थ भाई जाधव – रिपब्लिकन सेना, कर्जत तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!”
शाळेतील मूलभूत सुविधा तातडीने सुधाराव्यात, अन्यथा लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.