अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या ट्रस्टच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर आता मिश्रा राम मंदिर ट्रस्टच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये दाखल झाले. आपल्या सेवाकाळात त्यांनी 3,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव घेतला असून 18 पेक्षा अधिक प्रकारची लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर चालवले आहेत. 1999 च्या कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये मिराज-2000 विमानांवर लेझर-गायडेड बॉम्बच्या वापरात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टायगर हिल आणि मुंथो ढालो येथील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवरील कारवाईत या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला होता.
ऑपरेशन सिंदूरच्या काळातही मिश्रा यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 1 जानेवारी 2025 रोजी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मे 2025 मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हवाई कारवाईचे नेतृत्व त्यांच्या देखरेखीखाली झाले.
या कामगिरीबद्दल त्यांना युद्ध सेवा पदकासह यापूर्वी अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. चीफ टेस्ट पायलट, ऑपरेशन्स प्लॅनिंग अँड असेसमेंट ग्रुपचे डायरेक्टर आणि डेप्युटी चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता त्यांच्या संरक्षण क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कामकाजासाठी होणार आहे.