रायगड जिल्ह्यात वाढत असलेल्या मटका, जुगार, डान्सबार, ड्रग्स माफिया, वाळू माफिया, वन माफिया, आणि बेकायदेशीर व्यवसायांच्या प्रकरणांवर आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लेखी पत्र लिहून जिल्ह्यात सक्षम आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी व आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक तात्काळ नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
बेकावडे यांनी 35 वर्षांच्या सामाजिक कार्यकाळात अवैध धंद्यांविरोधात मोठी आंदोलने केली आहेत. याआधी स्वर्गीय आर.आर. पाटील (माजी गृहमंत्री) यांच्या सहकार्याने डान्सबार बंद करण्यात यश आले होते. मात्र, सध्या पुन्हा याच अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत असून स्थानिक अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
अवैध धंद्यांच्या वाढीमुळे गुन्हेगारीत वाढ
रायगड जिल्ह्यात मटका, जुगार, डान्सबार, रेव्ह पार्टी, बलात्कार, खून, दरोडे यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडत असल्याचे बेकावडे यांनी सांगितले.
शासनाचे दुर्लक्ष व अधिकाऱ्यांचे अपयश
27 डिसेंबर 2023 रोजी बेकावडे यांनी मंत्री व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून या विषयावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. उलट, दलालांचा सुळसुळाट आणि अवैध व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांवर अन्याय आणि दलालांचा हैदोस
बेकावडे यांनी स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांच्यावर होणाऱ्या अन्यायालाही वाचा फोडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच इतर प्रशासन कार्यालयांमध्ये दलालांचे वाढलेले जाळे आणि त्यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रश्न अनुत्तरितच
“सामाजिक कार्यकर्त्यांनी फक्त आंदोलने, उपोषणे व पत्रव्यवहार करूनच काम करावे, असेच शासनाला वाटते का?” असा संतप्त सवाल हरिष बेकावडे यांनी उपस्थित केला.
तात्काळ निर्णयाची मागणी
रायगड जिल्ह्यातील ही परिस्थिती गंभीर असून, चांगल्या प्रशासनासाठी तात्काळ आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी व आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक नेमण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
बेकावडे यांच्या या मागणीमुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि शासन यावर कधी पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.