‘लेक लाडकी योजना’ आता अधिक सुलभ; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्जाची सुविधा

लेक लाडकी योजना’ आता अधिक सुलभ
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी योजना’चा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा, यासाठी योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आता लाभार्थी मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
जुन्या पात्र लाभार्थ्यांसाठीही अर्जाची संधी
१ एप्रिल २०२४ पासून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. नव्या प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो फेच केली जाणार असून लाभार्थी तसेच त्यांच्या आई-वडिलांची e-KYC केली जाणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. तसेच योजनेतील पुढील टप्प्यांचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही.
थेट खात्यात जमा होणार लाभाची रक्कम
लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) रक्कम जमा केली जाणार असल्याने स्वतंत्रपणे बँक खात्याची माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही. अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना भरावी लागणार नाही. या सुलभीकरणामुळे अर्ज प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित होऊन अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना जन्मानंतर ५ हजार, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये, असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. योजनेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तसेच शासनाच्या उत्पन्न व इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.