वावंजे येथील एस.एस. इंजिनिअरिंग कंपनीच्या गोडावूनमध्ये घरफोडी करून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १८० मशिन पार्ट्स चोरणाऱ्या तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
दि. १४ ते १७ ऑगस्टदरम्यान वावंजे येथील एस.एस. इंजिनिअरिंगच्या गोडावूनमध्ये चोरी झाली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तळोजा-खारघर परिसरात सापळा रचून मोहम्मद आलीम अली हसन मन्सुरी (४५), मोहम्मद इर्शाद अली हसन मन्सुरी (३३) आणि कैस अनवर पटेल (३२) यांना अटक केली. या आरोपींकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत एकूण ७ लाख २२ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि ४ लाख ८० हजार रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण १२ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस कोठडीतील चौकशीत आरोपींकडून १८० मशिन पार्ट्स, ४६५ स्टेनलेस स्टील क्यूआरसी मेल पार्ट्स तसेच १३३ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा आणि बोलेरो पिकअपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून अधिक तपास पनवेल तालुका पोलिस करीत आहेत.