चौक | अर्जुन कदम
ग्राम सभेत ग्राम पंचायत अधिकारी यांच्यावर दडपण आल्याने एका ग्राम पंचायत अधिकारी याचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकारी यांनी याबाबत गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई १३६ यांनी या सदर्भात मंत्रालय, मुख्यकार्यकारी अधिकारी, सभापती व गटविकास अधिकारी यांना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत शिवरे येथे कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभेत दबाव वाढवण्याने हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई १३६ तीव्र निषेध नोंदवला असून मंत्रालयात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई १३६ यांची तातडीची बैठक होऊन संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे ग्राम पंचायत अधिकारी विश्वास वारे यांनी सांगितले.यापुढे कोणीही ग्राम पंचायत अधिकारी यांनी ग्रामसभेचे आयोजन करू नये असे निर्देश त्यांनी युनियन माध्यमातून दिले आहे.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून ग्रामसभांचा बहिष्कार करण्यात आला आहे.
आजपासून राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार सुरू असून कुणीही ग्राम पंचायत अधिकारी यांनी घाबरून न जाता याचे पालन करावे,संघटना आपल्या सर्व बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे सोबत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे. आज खालापूर येथे सभापती कृष्णा गंगाराम पारंगे व गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देण्यात आले.
