पेण तालुक्यातील एल.अँड.टी. सालिंदे कॉलनी येथे वैद्यकीय अर्हता नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देणाऱ्या व्यक्तीवर वडखळ पोलिसांनी कारवाई केली. दीपकंर सुशांत दास (वय ३७/३९, रा. एल.अँड.टी. सालिंद कॉलनी, पेण, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एल.अँड.टी. सालिंदे कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये दास हा बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगताना आढळून आला. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय अर्हता नसतानाही तो स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देत होता. तसेच रुग्णांकडून फीच्या स्वरूपात मोबदला घेऊन गैरलाभ मिळवत असल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५४ हजार ६१४ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गडब येथील वैद्यकीय अधिकारी चेतन अविनाश म्हात्रे यांनी याबाबत फिर्याद दिली. वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मपोसई श्रीमती सांगळे या पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शहरांपासून गावोगावी अशाच प्रकारे बोगस डॉक्टरांकडून प्रॅक्टिस सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ एका कारवाईपुरते न थांबता आरोग्य विभाग आणि प्रशासन अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन व्यापक कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.