शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान; प्रगतशील शेतकऱ्यांचा रोहा प्रेस क्लबकडून गौरव!

रोहा | प्रतिनिधी 
शेतकऱ्यांच्या कष्टाप्रति ऋण व्यक्त करत प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतावर जाऊन सन्मान करण्याची अभिनव परंपरा रायगड जिल्हा प्रेस क्लब गेली १६ वर्षें राबवित आहे. याच उपक्रमांतर्गत रोहा तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, निसर्गसंवर्धनासाठी केलेले कार्य आणि कृषी क्षेत्रातील योगदान समाजासमोर यावे, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा शेतकरी सन्मान जिल्हा प्रेस क्लब देत असते. रोहा-अष्टमी येथील सुपुत्र तथा तांबडी-निवी ठाकूरवाडी येथे विविध दुर्मिळ वृक्षांची लागवड करून निसर्गसंवर्धनाचा आदर्श निर्माण करणारे प्रयोगशील शेतकरी नितीन पिंपळे यांचा ‘कृतिशील प्रगतशील शेतकरी’ म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पिंपळे यांनी आपल्या विस्तीर्ण शेतात विविध दुर्मिळ फळझाडे, औषधी वनस्पती आणि अन्य वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांनी जाणून घेत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी धनंजय जोशी, अष्टमीचे अध्यक्ष महादेव साळवी, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, कृषी अधिकारी जोगदंड, शेतीनिष्ठ शेतकरी नितीन पवार, संतोष दिवकर, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, संपादक राजेंद्र जाधव तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी शेतीतील नव्या प्रयोगांबाबत चर्चा करत अशा उपक्रमांमुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
 करंजविरा येथील प्रगतशील महिला शेतकरी लीलाताई मोरे यांचाही त्यांच्या शेतावर जाऊन गौरव करण्यात आला. शेती क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेऊन आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ‘प्रगतशील शेतकरी’ सन्मान राजीपचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच बाळाराम मोरे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, प्रेस क्लबचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लीलाताई मोरे यांच्या कार्याचे कौतुक करत महिला शेतकऱ्यांसाठी त्या प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांचे योगदान हे देशाच्या अन्नसुरक्षेचा भक्कम पाया असल्याचे सांगत, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान हा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित नसून त्यांच्या कष्टाची समाजाकडून घेतलेली दखल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या या अभिनव उपक्रमामुळे प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून, शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी सांगितले.