शेतक‌ऱ्यांनी परदेशी अभ्यासदौऱ्यात व्हा सहभागी – पोलादपूर तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

पोलादपूर | शैलेश पालकर 
कृषी विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता कृषी विभागाकडून परदेशात अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे.
विविध देशांनी विकसित केलेल्या शेती विषयक तंत्रज्ञानाचा तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्याच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित केले जातात.
1 महिला शेतकरी व 2 राज्य तथा केंद्रियस्तरावरील विविध कृषि पुरस्कार प्राप्त व पीकस्पर्धा विजेते शेतकरी व इतर 3 शेतकरी असे जिल्हयातुन प्राम प्रस्तावामधुन एकुण 5 शेतकरी निवड केले जाणार आहेत. अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, शेतकऱ्यांचे अग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. शेतकन्याच्या उत्पनाचे मुख्य माधन शेती असावे, असे त्यांनी स्वयंघोषणापत्रात नमुद करावे, शेतकरी कुटुंबामधुन फक्त एकाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल, निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्याला सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी, शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे, शेतकरी शारीरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे किमान एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे, कोरोना विषयक तपासणी करून तसा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे, शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असावा, अर्ज सादर करतेवेळी पासपोर्टची वैध मुदत किमान एक वर्ष असावी, शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेत नोकरीस नसावा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार वगैरे नसावा असे त्यांनी स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, शेतकऱ्याने यापूर्वी शासकिय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील. अनुदानाचा तपशील शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी येत्या चार दिवसात अर्ज परिपूर्ण माहितीसह या पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे.