वाढदिवसाचा आनंद वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत; सागर पेरेकर यांचा सामाजिक उपक्रम

अलिबाग |अमुल कुमार जैन
वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि आनंदाचा क्षण न राहता तो सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी ठरू शकतो, याचा आदर्श अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य मित्र सागर पेरेकर यांनी घालून दिला. आपल्या कन्या हित्वी हिचा वाढदिवस त्यांनी सामाजिक दायित्वाचे भान ठेवून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला.
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळ भाटओके आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मानी येथील सहजानंद अध्यात्मिका गोपाळ निवास वृद्धाश्रमात हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आनंदात सहभागी करून घेत त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशा भेटवस्तू देण्यात आल्या. कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंद वाटून घेण्याचा उपक्रम उपस्थितांसाठीही भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
या प्रसंगी सागर पेरेकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सामाजिक जाणीव आणि माणुसकीची भावना जपत साजरा केलेला हा वाढदिवसाचा उपक्रम समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.