रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी मोठा दिलासा देणारी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत ‘पशुधन विमा योजना’ आता जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, रोगराई, सर्पदंश, विषबाधा किंवा अपघातामुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांना त्वरित आर्थिक मदत मिळणार असून, केवळ १५ टक्के विमा हप्ता भरून लाखोंपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. याबाबतची माहिती रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त रत्नाकर काळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की, हवामान बदलामुळे पूर, वीज पडणे, दुष्काळ, रोगराई, लंपी स्किन डिसीज, घटसर्प यांसारख्या साथींचा वाढता धोका लक्षात घेता पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. अशा वेळी शासनाकडून मिळणारी मदत अत्यल्प ठरत होती. मात्र आता पशुधन विमा योजनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांना संकटातून सावरणे सोपे होणार आहे. या योजनेत देशी व संकरीत दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्या यांचा समावेश असून एका कुटुंबातील जास्तीत जास्त दहा जनावरांचा विमा उतरवता येणार आहे. दुभत्या गाईसाठी ७० हजार रुपये, म्हैस किंवा रेड्यासाठी ८० हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी ७ हजार रुपये इतके कमाल विमा संरक्षण उपलब्ध राहील. लाभार्थ्याला फक्त १५ टक्के हप्ता भरावा लागणार असून उर्वरित ८५ टक्के प्रीमियम केंद्र व राज्य शासन अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात भरणार आहे.
विमा कालावधी एक, दोन किंवा तीन वर्षांचा निवडता येणार आहे. पशुधनाचा मृत्यू झाल्यास आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर विमा कंपनीने १५ दिवसांच्या आत थेट डीबीटीद्वारे नुकसानभरपाई जमा करणे बंधनकारक असून विलंब झाल्यास लाभार्थ्याला १२ टक्के व्याजासह भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, इअर टॅगसह पशुधनाचे छायाचित्र, तसेच नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, ग्रामसेवक किंवा गो-मित्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती वैकुंठ पाटील यांनी केले.