कर्जतमध्ये युरियाची टंचाई; ४०० टन मागणी, साठा केवळ ५० टन

कर्जतमध्ये युरियाची टंचाई
कर्जत | गणेश पवार
खरीप हंगामातील पिकांना खताची गरज असतानाच कर्जत तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृषी विभागाच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अहवालानुसार, तालुक्यात आतापर्यंत १,१३२.५६ मेट्रिक टन युरियाची आवक झाली असून १,०८२.२६ मेट्रिक टन विक्री झाल्याची नोंद आहे. त्यामुळे केवळ ५०.३० मेट्रिक टन साठा शिल्लक असून युरियाची मागणी तब्बल ४०० मेट्रिक टन आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, युरियासह NPKS आणि SSP या खतांची एकूण १,४१३.५६ मेट्रिक टन आवक झाली असून १,३२०.५४ मेट्रिक टन खताची विक्री झाल्याची नोंद आहे. विविध कृषी सेवा केंद्रे आणि विक्रेत्यांकडे युरियाच्या पुरवठ्याच्या नोंदी असतानाही कर्जत शहरासह कशेळे, कडाव, नेरळ आणि अन्य भागांत शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासकीय नोंदीतील आवक-विक्री आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होणारा पुरवठा यामध्ये तफावत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, युरियाचा उपलब्ध साठा आणि शेतकऱ्यांच्या मागणीतील मोठी तफावत पाहता कृषी विभागाने विक्रेत्यांकडील प्रत्यक्ष साठा, विक्री नोंदी तसेच पॉस मशीनवरील व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. “शासनाच्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात युरियाची आवक झाली आहे; खरीप पिकांना खत देण्याचा महत्त्वाचा कालावधी असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुरेसा युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
————————————
तालुक्यात युरिया खताची कमतरता असताना अनुदानित दरातील युरियाची एक बॅग मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जत, कशेळे, कडाव, नेरळ आदी बाजारपेठांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. या फेऱ्यांमध्ये वेळ आणि प्रवासाचा खर्च होत असून, अनेकदा हेलपाटे मारूनही खताची बॅग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पदरमोड होत आहे. तालुक्यातील अशा पीडित शेतकऱ्यांशी संपर्क करून युरिया खताच्या तुटवड्याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल आणि संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी करण्यात येईल.
…अंकुश शेळके, प्रगतशील शेतकरी तथा उपाध्यक्ष, शेतकरी सल्ला समिती (BFAC), कर्जत