कुडपणमध्ये पर्यटन महोत्सवाची हाक; पर्यटकांना भोजनासह निवासव्यवस्था मोफत

पोलादपूर | शैलेश पालकर 
 तालुक्यातील कुडपण या ऐतिहासिक व पुरातन अविकसित पर्यटन स्थळी शनिवार, दि. 22 ऑगस्ट आणि रविवारी दि.23 ऑगस्ट रोजी पर्यटन महोत्सवाची हाक स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थांनी दिली आहे. यानिमित्ताने पर्यटकांना भोजनासह निवासव्यवस्था मोफत देण्याचा इरादाही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी जाहीर केला आहे.
कुडपणचा इतिहास कोणालाही सांगता येण्यासारखा प्रचलित नाही. महाराष्ट्रगौरव पुरस्कार मिळालेले महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांच्या जन्मगांवाचा उल्लेख या गावाच्या अनुषंगाने कायम केला जाऊ शकेल. ब्रिटीशकालीन नकाशामध्ये हिलस्टेशन अशी या कुडपणबाबत नोंद असल्याची माहिती गेल्या 25 वर्षांपासून मिळाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी अनेक गैरसुविधा असल्याने या कुडपणच्या पर्यटन विकासाच्या मानसिकतेचा आलेख मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरीखोऱ्यांतून पहाडी स्वरूपाची राकट देहाची काटक माणसं कुडपण परिसरामध्ये वास्तव्याला होती. याठिकाणी मांत्रिक तांत्रिक आणि शिकार करून अन्न मिळविण्यासोबत कंद आणि अन्य रानभाज्यांचाही उपभोग घेतला जात असे. या परिसरातील वनौषधींची चर्चा अगदी मुंबईपर्यंत होत असून तोरणं, जांभळं, करवंदं, आंबे, फणस आदींची लयलूट करण्यासाठी मुंबईस्थित कुडपणकर ग्रामस्थ उन्हाळयाचे किमान 15 दिवस तरी वास्तव्य करण्यास येत असत. आध्यात्मिकदृष्टया श्रीगणेशनाथ महाराज संस्थानाशी नाळ जोडल्यानंतर कुडपणकरांनी हरि भक्त परायण भुमिकेतही मांसाहार वर्ज्य करून हरी नाम जपण्यास सुरूवात केली.
कुडपण येथील भराडा, भुतरान आणि आवेरी या तीन नद्यांच्या उगमस्थानाजवळच जगबुडी नदीमध्ये संगम झाला आहे. तेथे औदूंबराचा एक निष्पर्ण वृक्ष आश्चर्यकारकरित्या जीवंत स्थितीत आहे आणि तो या त्रिवेणी संगमावर दीडशे वर्षांपासून पानांविनाच वाढत आहे. याठिकाणी असलेल्या स्वयंभू भराडीदेवीच्या मंदिरामध्ये काळकाईदेवीदेखील आहे. अतिशय प्राचीन असे हे देवस्थान असून आजही त्याच स्थितीत आहे. या मंदिरात एक विशाल पुरातन सांबरशिंग मंदिरात प्रवेश केल्यानंतर दिसून येते. अलिकडेच, एका भाविकाने भराडीमातेला सोन्याचा मुकूट अर्पण करून नवसपूर्ती केली आहे. यावरून या भराडीमातेची प्रचिती भाविकांना आजही येत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
अलिकडेच या कुडपण गावात वातारकांब नावाची एक गुहा आढळून आली आहे. पोलादपूर तालुक्यात पायटे गावातही भराडीमातेचे मंदिर आहे. ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सिंहगड येथे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आढळून येते तशीच दुसरी समाधी पोलादपूर तालुक्यातील उमरठमध्ये दिसते. त्याचप्रमाणे पोलादपूरच्या उमरठमधील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीमध्ये शेलारमामांचीही समाधी असून शेलारमामांची दुसरी समाधी कुडपण येथे असल्याचे सांगितले जात आहे.
कुडपण येथे प्रस्तरारोहण करण्यासाठी येथील भिमाची काठी या दूर्गम सुळक्यावर चढाईसाठी काही गिर्यारोहकही तीन-तीन दिवसांचे कॅम्प करतात. यापूर्वी याठिकाणी गिर्यारोहकांनी बर्मा ब्रिज हा तात्पुरता दोरखंडाच्या साह्याने पुल बांधून भिमाच्या काठीपर्यंत जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. शेलारांच्या कुडपणकडे प्राथमिक व शाळा, माध्यमिक शाळा आहे. सद्गुरू अरविंदनाथ महाराजांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे उत्तम गांवगाडा चालतोय. मात्र, रस्ता नसल्याने अनारोग्य व अपघातप्रसंगी आजही फारच अडचण निर्माण होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे गांव इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हिलस्टेशन असल्याचे नमुद करण्यात आले. या गावाचे सुपुत्र नायक कृष्णा सोनावणे यांनी ब्रिटीशांच्या बॉईज कंपनीतून सैन्यात प्रवेश घेतल्यानंतर स्वतंत्र भारतातील सेनादलामधून पाकिस्तानी सैन्याची आणि कबाली घुसखोरांची दाणादाण उडविल्याबद्दल त्यांचा महावीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याकाळी जन्मगावी कुडपण येथे सेवानिवृत्तीनंतर राहून उर्वरित आयुष्य कंठणे, तेथील अविकसित आणि भौगोलिक परिस्थितीमुळे केवळ अशक्य असल्याने त्यांनी येथे राहणे टाळले.
काही वर्षांपूर्वी कुडपण येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील राजेंद्र शेलार या तरुणाने केलेला वर्षा सहलीचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाच पुलाखालील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू होऊन पर्यटन विकासासाठीचे प्रयत्न खुंटले होते.
अलिकडेच, मिनी महाबळेश्वर कुडपण बुद्रुक व कुडपण खुर्द परिसरामध्ये ‘प्रति रायगड’ साकारण्यासाठी शिवछत्रपतींचा मेघडंबरीचा पुतळा तसेच पहिल्या कुडपणमधील काळकाई व तिसऱ्या कुडपणमधील भराडीदेवीचे मंदिर पर्यटन विकासातून विशेष निधीची उपलब्धता करण्याचे वचन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले आहे. गेल्या वर्षभरात सातारा जिल्हा हद्दीचा कोंडूशी गावापर्यंतचा रस्ता 3 किमीपर्यंत पूर्ण झाला असून पुढील कामासाठी आवश्यक निधी 4-5 कोटींची उपलब्धता होईपर्यंत काम सुरूच राहणार आहे. 
पोलादपूरपासून कुडपणपर्यंत येण्याचा रस्ता पुन्हा करणार आहे, अशी भूमिका कुडपण बुदु्रक येथील सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट करून कोंडूशीपर्यंत जोडणारा सातारा जिल्हा हद्दीचा रस्ता कुडपण धनगरवाडीपासून जवळ असताना तो तिसऱ्या कुडपणपासून 8-10 कि.मी. अंतरावर डोंगरमाथ्यावरून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामुळे या रस्त्यावर पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे नवीन पॉईंटदेखील विकसित करण्याची संधी निर्माण झाली आहे.
कुडपण येथील पर्यटन महोत्सवानिमित्त रायगड जिल्हा, कोकण, तसेच राज्यासह देश-विदेशातील पर्यटक कुडपण परिसरातील निसर्गरम्य दृश्ये, धबधबे, नद्या, ट्रेकिंग व निसर्ग भ्रमण, संध्याकाळी धुकं व गारवा यांचा अनुभव घेणार आहेत. या काळात सोशल मीडियावरून रिल्स, फोटोग्राफी व व्हिलॉग्स तसेच वृत्तपत्रांतून निसर्ग पर्यटन वर्णनात्मक लेखनाद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी या कुडपण पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच सचिन चिकणे आणि मुंबईस्थित अशोक चिकणे यांनी दिली.