सुधागड तालुक्यातील पोटलज (खुर्द) येथील मानसिकदृष्ट्या अक्षम महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६३ वर्षीय सदानंद काशिनाथ कदम याला माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
पाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि ३७६(२)(L) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला घराच्या पायऱ्यांवर बसलेली असताना आरोपीने तिच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेत तिला बंद घराच्या व्हरांड्यात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांनी केला.
न्यायालयाने कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, तर कलम ३७६(२)(L) अंतर्गतही १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येकी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय पीडित महिलेला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. जे. डी. म्हात्रे यांनी बाजू मांडली, तर पोलीस उपनिरीक्षक संतोष राम माने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.