आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न ऐरणीवर; निकृष्ट भाज्यांचा पुरवठा होत असल्याचा आरोप

निकृष्ट भाज्यांचा पुरवठा होत असल्याचा आरोप
कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर 
कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सकस आहार मिळावा यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, भाजीपाला पुरवठ्यातील कथित हलगर्जीपणा आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची भाजी मिळत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पाच-सहा दिवसांनी भाजीचा पुरवठा
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना ताजी भाजी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पाच ते सहा दिवसांच्या अंतराने भाजीचा पुरवठा होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. सोमवारी भाजी घेऊन आलेला टेम्पो आश्रमशाळेच्या गेटवर अडवून कार्यकर्त्यांनी भाजीची पाहणी केली. यावेळी केळी काळवंडलेली, दुधीवर काळे डाग, कोबी काळसर झालेली तसेच इतर काही भाज्याही खराब अवस्थेत आढळल्याचा आरोप करण्यात आला. अशा भाज्या विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
कर्जत तालुक्यातील आश्रमशाळांना भाजीपाला पुरवठ्याचे काम गजानन महाराज कॅटर्स कंत्राटदारामार्फत केले जात असल्याचे संघटनेने सांगितले. कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधून निकृष्ट भाजीबाबत माहिती दिली. आदिवासी विकास विभाग, ठाणे तसेच पेण प्रकल्प अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आश्रमशाळांमधील अन्नधान्य व भाजीपाला पुरवठ्याची तपासणी करावी आणि संबंधित कंत्राटदाराला सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास संघटनेने आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.